Language
 
  Chitpavan
 
 
  Existance period  
  जरी चित्पावन समाज हा शिक्षित आणि पुढारलेला असला तरी त्यांच्या कोकणात येऊन स्थायिक होण्याविषयी ठोस अशी माहिती मिळत नाही. याचे कारण इतिहास लिहून ठेवण्याविषयी असलेली अनास्था असेल वा समुद्रसान्निध्यामुळे वारंवार समुद्रीचाच्यांकडून होणारी लुटमार असेल अथवा वारंवार होणारे सत्तापालट असावेत. परंतु कुलवृत्तांत लिहिणे ह्या चित्पावनांच्या वैशिष्ठ्यामुळे, तसेच श्राद्ध-तर्पण विधींमध्ये लागणाऱ्या आधीच्या चार पिढ्यांच्या नावांच्या प्रथेमुळे पूर्वजांबद्दल थोडीफार माहिती संकलित झाली. उपलब्ध कुल्वृत्तान्तांवरून चित्पावनांचे अस्तित्व सतराव्या शतकापासून महाराष्ट्रात आहे असे ध्वनित होते. रा. शं. वाळिंबे यांच्या प्रतिपादनानुसार १७व्या शतकाच्या उत्तरार्धात (शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काही ब्राह्मणांनी क्षात्रधर्माचा अंगीकार केला व तदनंतर १८व्या शतकाच्या सुरुवातीस बाळाजी विश्वनाथांबरोबर अनेक ब्राह्मण कुटुंबे कोकणातून येऊन देशावर स्थायिक झाली. अनेक ब्राह्मणांनी आपली परंपरागत याज्ञिकी सोडून क्षात्रधर्माचा अवलंब केला.
प्रकाश गोडसे यांच्या संशोधनाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.
दिवेआगर येथे मिळालेल्या ताम्रपटानुसार इ.स. १०६०/१०६१ सुमारास भट, घैसास व देवल या आडनावाच्या व्यक्तींना दाने दिल्याचा उल्लेख आहे. महिकावतीच्या बखरीत, इ.स. ११३९ साली प्रतापबिंबास आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांमध्ये देवधर व छत्रे हे ब्राह्मण होते असा उल्लेख आहे. तसेच शिलाहारांच्या राजवटीत जुने वृत्तीवंत असलेल्या पटवर्धन नावाच्या ब्राह्मणाची वृत्ती प्रतापबिंबाने कायम केली असा उल्लेख आहे. इ.स. १४९७ मध्ये अनंतभट्ट (वासुदेवभट्ट) चितळे यांनी रत्नागिरीजवळ बसणी रस्त्यालगतचे बुजलेले तळे खोदून पांथस्थाना पिण्याच्या पाण्याची सोय करून दिल्याचा उल्लेख मिळतो. भट, घैसास, देवल, देवधर, छत्रे, चितळे, पटवर्धन ही नावे इतर कोणत्याही ब्राह्मण समाजात प्रचलीत नसल्याने चित्पावनांचे कोकणातील अस्तित्व अकराव्या शतकापासून असल्याचे ध्वनित होते.   
कुर्माचलजवळील गढवाल भागात सुमारे ५५४० मी. उंचीवरील रूपकुंड या बर्फाच्छादित जागी १९४२ साली शेकडो मानवी सांगाडे मिळाले. ऑक्सफर्ड विद्यापिठ्ने केलेल्या ‘कार्बन डेटिंग’ चाचण्यानुसार त्यांचा काळ इ.स. ८५० असा निश्चित केला आहे. हैद्राबाद येथील ‘Centre for cellular and molecular biology’ यांनी केलेल्या डी.एन.ए. चाचण्यांवरून ते कोकणस्थ चित्पावन ब्राह्मणांचे असल्याचा निष्कर्ष काढला आहे. डॉ. द. वि. जोगांच्या प्रतीपादनानुसार पहिल्या व दुसऱ्या पुलकेशी राजांनी इ.स.५३५-६४२ च्या सुमारास केलेल्या यज्ञांसाठी पौरोहित्य करण्यासाठी चित्पावन ब्राह्मणांना कोकणात आणले.
याआधी नमूद केल्याप्रमाणे ख्रिस्तपूर्व २०० च्या सुमारास झालेल्या दुष्काळामुळे चित्पावन ब्राह्मण राजस्थान, कच्छ प्रांतांतून उत्तरेस गंगा यमुना तर दक्षिणेस कोकणातील नद्यांच्या काठी तसेच खाली कर्नाटक व तमिलनाडु प्रांतात स्थलांतरित झाले असावेत.
 
वरील विवेचनावरून सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी चित्पावन ब्राह्मण उत्तरेतून प्रथम कोकणात येऊन स्थायिक झाले असे मानावे लागेल. त्यानंतर सुद्धा हे स्थलांतर विविध कारणांनी होत राहिले असावे.   
१८८० च्या (Gazeteers of Bombay Residency-Ratnagiri and Savantwadi) मध्ये पुढील उल्लेख आढळतात: उत्तरेस सावित्री आणि दक्षिणेस देवगड या टापूत विविध ठिकाणी वसलेल्या चित्पावनांचे मूळ वसतीस्थान चिपळूण जवळील परशुराम टेकडी येथे आहे. चित्पावनांच्या या आधीच्या इतिहासाची नोंद सापडत नाही. परंतु रत्नागिरीत प्रचलित दंतकथांनुसार, परशुरामाने जहाज बुडून समुद्रकिनारी येऊन पडलेल्या १४ मरणोन्मुख देहात चेतना फुलवून त्यांचे रत्नागिरी येथे पुनर्वसन केले. यांची प्रजा म्हणजे चित्पावन होत. त्यांच्या काहीही उपशाखा नसून आपल्या शाखेबाहेर विवाह त्यांना निषिद्ध आहे. जिल्ह्यातील एकूण ब्राह्मण वस्तीपैकी ३०००० म्हणजे ४५.४२% हे चित्पावन ब्राह्मण आहेत.     
 
     
  Background:  
  ज्यांची मनोधारणा व विचारप्रणाली (चित) शुद्ध (पावन) आहे ते चित्पावन असा एक विचारप्रवाह आहे. चित्पावन वंश हा मूळचा भारतातील का कोण्या परक्या देशातून येथे येऊन स्थायिक झालेल्याना त्यांच्या वसतीस्थानावरून पडलेले हे बिरूद आहे याबद्दल इतिहासतज्ञ विविध मते मांडतात. त्यापैकी काही प्रमुख मतप्रवाह असे आहेत.
१.    एकवाक्यता नसलेल्या पुराणकथांचा विचार करणाऱ्यांच्या मते परशुरामाने त्यांना कोकणात आणून वसवले. असे मानले तरी त्यांना का व केव्हा आणले याबाबतची तर्कशुद्ध कारणे पुराणात मिळत नाहीत. स्कंद पुराणात चित्पावनांचा उल्लेख श्रीपरशुराम व चिपळूण यासमवेत आहे. काही पुराणातील ‘चित्तपावन’ अशा उल्लेखामुळे ‘चित्तपावन’ असे जातीनाम रूढ झाले असावे.
२.    इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या ‘भारत इतिहास संशोधन मंडळा’च्या इतिवृत्तात प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘चित्तपावन’ नामक गावात राहणारे ते ‘चित्तपावनस्थ’ अशी व्युत्पत्ती दिली आहे. कालानुरूप अपभ्रंश होत ‘चित्तपावन’ व नंतर ‘चित्पावन’ असे झाले असावे असे प्रतिपादन केले आहे.
३.    रावबहादूर साने यांनी हा सिद्धांत खोडून काढताना ‘चित्पावन’ ही संज्ञा गावाच्या नावावरून आली नसल्याचे प्रतिपादन काही व्यावहारिक लेखांच्या स्वरूपाचे दाखले देऊन केले.
४.    चित्पावनांतील सर्वसाधारणपणे आढळून येणारी वैशिष्ठे म्हणजे त्यांचा गौरवर्ण व घारे डोळे. यावरून त्यांच्या मुलस्थानाविषयी विविध मतप्रवाह दिसून येतात. काही त्यांना पर्शियामधील अग्निपूजक म्हणजे पारशी, काही शक तर काही  सिकंदरासमवेत आलेले ग्रीक, काही त्यांना ईजिप्शीयन, ज्यू वा जर्मन मानतात, तर काहीजण एका अर्वाचीन लिखाणाला प्रमाण मानून त्यांना ‘हिरण्यकेशी’ शाखेचे साष्टिक ब्राह्मण मानतात.
५.    कानिटकर कुलवृत्तान्तामध्ये पुढील संदर्भ आढळतो.
कोकण भागास परशुराम-भूमी असे म्हणतात. क्षत्रियांशी दीर्घकाळ युद्ध केल्यानंतर, विश्रांतीसाठी त्यांनी  ब्राह्मणांच्या काही कुलांसह, कोकणच्या ओसाड व एकाकी प्रांतात येऊन वसाहत स्थापन केली असावी असा एक मतप्रवाह आहे. पाण्याला ‘जीवन’ असे म्हटले जाते, कारण सजीवांच्या अस्तित्वासाठी तो एक अत्यावश्यक घटक आहे. याकारणानेच मनुष्य-वस्ती ही पूर्वापार नद्यांच्या आसपास होत असे. कोकणात ‘वशिष्टी’ व ‘सावित्री’ या नद्यांच्या टापूतील सध्याचे ‘चिपळूण’ हे शहर आहे. लागवडीसाठी जमिनीत ‘राब’ घालणे म्हणजेच ती भाजून शुद्ध करून घेणे या क्रियेस ‘चित्पोळण’ म्हणत असत. चौदा कुळाच्या व गोत्राच्या ब्राह्मणांकडून शुद्धी करून नव्याने वसवलेल्या या वस्तीचे नाव ‘चित्पोळण’ असे ठेवले असावे असे मानले जाते. ‘चित्पोळण’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन चिपळूण हे नाव पडले असावे असा एक विचारप्रवाह आहे. ‘क्षिती’ म्हणजे जमीन व तिचे शुद्धीकरण करणे म्हणजेच ‘क्षितिपावन’.  चित्पावन या शब्दाची व्युत्पत्ती ‘चित्पोळण’ अथवा ‘क्षितिपावन’ या शब्दांचे अपभ्रंश होऊन झाली असावी असे दोन भिन्न मतप्रवाह आहेत.
दक्षिण भारतातील ब्राह्मण, मातुलकन्येशी विवाह निषिद्ध मानत नाहीत परंतु उत्तर भारतात मात्र ब्राह्मणांमध्ये ते निषिद्ध मानले जातात. यावरून चित्पावन ब्राह्मण हे उत्तर हिंदुस्तानातून कोकणात येऊन स्थायिक झाले असे मानण्यास हरकत नाही. कच्छ व काठेवाड प्रांतातील ‘नागर’ ब्राह्मण व कोकणातील चित्पावन ब्राह्मण यांच्यात वर्ण डोळे, चेहऱ्याची ठेवणइत्यादी बाबतीत खूपच साम्य आहे. तसेच काही आडनावातही साधर्म्य आहे. यावरून उत्तरेतून येऊन काहीजण कच्छ व काठेवाड मध्ये तर काहीजण पुढे कोकणात स्थलांतरित झाले असावे या निष्कर्षास बळकटी मिळते.
 
६.    श्री. प्रकाश नरहर गोडसे यांनी गोडसे कुलवृत्तांतात केलेले विवेचन पुढीलप्रमाणे:
चित्पावनांचे रंगरूप, चित्पावनी भाषा, आहारात चिंच-गूळ व ताकाला असलेले महत्व, विवाहसंबंधात सपिंड संकल्पनेचे महत्व, अल्पसंतुष्ट, व्यवहारी, कंजूष पण स्वाभिमानी वृत्ती, इत्यादी बाबी महाराष्ट्रातील इतर कोणत्याही वर्गात आढळत नाहीत. यावरून ते परप्रांतातून येऊन कोकणात स्थायिक झाले असावेत या तर्काला पुष्टी मिळते.
इतिहास, विविध पुराणकथा व आख्यायिका, त्या निर्माण होण्याची कारणे, अन्य प्रांतातील रीतीरिवाज, आहार व भाषेशी असणारे साम्य इत्यादींच्या आधारे चित्पावनांच्या मूलस्थानाविषयी स्पष्ट अनुमान करणे शक्य आहे. तसेच ऐतिहासिक नोंदी, दानपत्रे, पौराणिक कथा आणि चित्पावनांच्या काही कुलवृत्तांतात दिलेल्या संकल्पना यावरून त्यांच्या कोकणातील पूर्वकालीन वास्तव्याबाबत ठोस प्रतिपादन करणे शक्य आहे.   
मानवी स्थलांतराच्या कारणांमध्ये उदरनिर्वाह तसेच व्यवसाय ही जरी प्रमुख करणे असली तरी आकस्मिक आलेल्या दुष्काळामुळे स्थलांतर जास्त प्रमाणात होणे स्वाभाविकच आहे. चित्पावन हे वेदविद्याप्रतिपालक षटकर्मि शुद्ध ब्राह्मण होते. ते नोकरीपेशात तसेच व्यापार-उदीम आदि व्यवसायात नव्हते. खाडीपट्ट्यातील खारजामिनींचे व ओसाड जमिनींचे विकसन करून शेती करणाऱ्या या जमातीच्या स्थलांतराचे एकमेव कारण दुष्काळ हेच असणे जास्त संभवनीय आहे. ख्रिस्तपूर्व २०० च्या काळात झालेल्या १२ वर्षाच्या महादुष्काळाचा (जैन वान्ग्मयात या दुष्काळाचे संदर्भ मिळतात) परिणाम उत्तरेतील सिंधू, गंगा व यमुना नद्यांच्या खोऱ्यांवर जरी झाला नसला तरी राजस्थान, कच्छ व मध्यप्रदेश या टापूत तो प्रकर्षाने जाणवला असावा. त्यामुळेच या प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊन उत्तरेतील गंगा, यमुना व खाली दक्षिणेतील कोकणातील नद्यांच्या टापूत वस्ती झाली असावी असे मानणे संयुक्तिक ठरेल.
चित्पावनांचा त्वचावर्ण महाराष्ट्रातील प्राकृतांपेक्षा उजळ असल्याने त्यांचे उत्तरेतून स्थलांतर होण्याची शक्यता मान्य करावी लागते. त्याच काळात उत्तरेतूनच आलेल्या पाठारे प्रभू, सोमवंशी क्षत्रिय, सूर्यवंशी क्षत्रिय, पांचाल या जमाती तसेच चौदाव्या/पंधराव्या शतकात आलेल्या सारस्वत, गौड, गौड सारस्वत व कायस्थ या जमातीतही गौरवर्णाचे प्रमाण प्राकृतांपेक्षा जास्त आहे.     
सांस्कृतिक परंपरेच्या निकषावरही चित्पावनाचे उत्तरेकडून झालेलं स्थलांतर खरं ठरतं. स्वगोत्र आणि पित्याच्या घराण्यातील पाच तर मातुल घराण्यातील तीन पिढ्यातील रक्ताच्या नात्यात विवाहसंबंध न करणं ही आहे सपिंड संकल्पना. या संकल्पनेचे पालन गुजरातपासून उत्तरेकडील उच्चवर्णीयांमध्ये कसोशीने होते उदा. हरियाणातील खाप पंचायत. महाराष्ट्रातील बहुतांश जातींसह बहुतांश ब्राह्मण जातीतही असे विवाह त्याज्य नसले तरी चित्पावन ब्राह्मण या सपिंड संकल्पनेचं पालन करतात.    
 
     
  Language , Social and Habitat  
  स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत म्हणजे सुमारे १९४०/४५ पर्यंत चित्पावन लोक घरांमध्ये चित्पावनी भाषा बोलत असत. घराबाहेर मात्र ते मराठीचा वापर करीत. चित्पावनी ही एक बोली भाषा आहे. चित्पावनीवर मराठीचा मोठा प्रभाव जरी असला तरी गोव्यात बोलल्या जाणाऱ्या कोकणी व पोर्तुगीज तर कर्नाटकी तुलू भाषेतील काही शब्दही चित्पावनीमध्ये आले आहेत. रत्नागिरीत सुमारे ३०/३५ वर्षांपर्यंत तर गोवा, व कर्नाटकातील कारवार, साउथ कॅनरा, मंगळूर पर्यंत चित्पावनांच्या घरात ती आजही बोलली जाते. ही बोलीभाषा जलद नष्ट होण्याच्या मार्गावर असली तरी गोवा व आसपासच्या प्रदेशातील चित्पावन तिला पुन्हा प्रचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. १९८० च्या सुमारास डॉ. सौ. वसुधा भिडे यांनी रत्नागिरी परिसरात चित्पावनीवर  संशोधन करून प्रबंध लिहिला आहे तसेच मंगळूरच्या सौ. जोशी यांनी ‘चित्पावनी गीते’ व ‘चित्पावनी म्हण्यो’ अशी दोन पुस्तके तर गोवातील एकाने चित्पावनी व्याकरण प्रसिद्ध केले आहे.(संदर्भ: प्रकाश गोडसे)
हाडाचे कष्टाळू असलेल्या चित्पावनांना खाड्या/समुद्रालगतच्या डोंगरउतारावरील पडीक जमिनी वसतीसाठी दिल्या गेल्यानंतर त्या कसून त्यांनी घरे बांधली. खाड्या/ फासवांमध्ये भराव घालून मळेजामिनी तयार केल्या. विहिरी खणल्या. सडा (म्हणजे डोंगरउतार) ते मळा या परिसरात खैर, पळस, काजरा, नागचाफा, बहावा, शिसम, साग, पांगारा, जांभूळ आदि उपयुक्त वृक्ष तर त्यापुढे आंबे, काजू आदींची लागवड करीत. उतारावर पायऱ्या पायऱ्यांच्या वाफ्यात पावसाळी शेती करीत. त्यानंतर घर, गोठा, घराच्या बाजूस विहीर व विहिरीच्या खालच्या अंगाला केळी, अळूची लागवड असे जिथे घरातील सांडपाणी सोडलेले असे. त्याच्या खाली माड, पोफळी, फणस, शेवगा, पपनस व फुलझाडे लावलेली असत. वेद्विद्याप्रतीपालक चित्पावनांची घरे म्हणे आश्रमशाळाच. आलेल्या विद्यार्थ्यांना वेद्विद्येचे मौखिक पाठ दिले जात. यदाकदाचित विद्यार्थी मिळाले नाहीत तर अमर मानलेल्या पिंपळाचे झाड ओट्यावर लावून त्याचा ‘व्रतबंध’ करून या अमर अशा विद्यार्थ्याला संथा देत असत व वेद्विद्येला विस्मृतीत जाण्यापासून वाचवत. (संदर्भ: प्रकाश गोडसे)
Gazeteers of Bombay Residency मधील उल्लेख पुढीलप्रमाणे:
समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या चित्पावनांच्या वस्त्या/ वाड्या इतर गावांच्या तुलनेत खूपच स्वच्छ व सुबक असत. नारळी पोफळीच्या किंवा आंबे फणस अशा झाडांनी वेढलेली, दगडी चिरे वापरून बांधलेली टुमदार घरे, पुढील अंगणात गोठा आणि विहीर वा छोटे तळे/ पाट, छोटे देऊळ, अशी रचना असे.    
 
     
  Physical Appearence  
  गौर वर्ण व घारे डोळे ही चित्पावनांची प्रमुख वैशिष्ठे. गौरवर्णामुळे चित्पावन हे युरोपसारख्या प्रदेशातून भारतात आले असावेत असाही एक विचार प्रवाह आहे. परंतु भारताच्या उत्तरेकडील अतिशीत प्रदेशातून स्थलांतरित झाल्यामुळे देखील गौरवर्ण प्राप्त झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Gazeteers of Bombay Residency नुसार: घारे (क्वचित भेदक) डोळे, गौर वर्ण, साधारण उंची, मध्यम पण मजबूत बांधा, काटक शरीरयष्टी, बुद्धिमत्तेची चमक दर्शविणारा देखणा चेहरा ही सर्वसाधारणपणे चित्पावन पुरुषांची वैशिष्ठ्ये. तर स्त्रिया कमनीय, नाजूक लहान शरीरयष्टीच्या व सुंदर.       
 
     
  Dress and  
  Gazeteers of Bombay Residency नुसार: चित्पावन लोक बहुतांशी स्वच्छ, नीटनेटके, व टापटीप राहणी असलेले असतात. डोक्यास पागोटे व फेटा, अंगात लांब बाह्यांचा अंगरखा, बाराबंदी वा बंडी, उपरणे,अंगवस्त्र, कमरेखाली धोतर, पायात जोडे वा मोजड्या, पावसाळ्यात वाहणा वा चपला हा पुरूषांचा पेहराव. शहरातील पुरुष विजारी (trousers), चामडी boot वगैरेही वापरतात. स्त्रिया अंगभर कपड्यात असतात. नऊवारी लुगडे, काचोळी, छोट्या बाह्यांची चोळी हा सर्वसाधरण स्त्रियांचा पेहराव. कपडे पूर्णतः कपाशीच्या वस्त्रांचे असतात. काही श्रीमंत स्त्रिया लोकरीच्या शाली वापरतात. कपडे नीटनेटके, शरीरावर चपखल बसतील असे बहुशः उठावदार अशा गुलाबी, लाल, काळ्या, पांढऱ्या व हिरव्या रंगाचे आणि पूर्ण शरीर झाकणारे असतात. केस लांबसडक असून त्यांचा अंबाडा किंवा खोपा घालून नीटनेटके बांधलेलं असतात. पुरुष उजव्या कानात मोत्याची भिकबाळी, बोटात सोन्याच्या अंगठ्या आदि अलंकार वापरतात. स्त्रिया नाकात सोने/मोत्याची नथ, कानात बुगड्या, केसात राखाडी, चंद्रकोर, केवडा, केटा, गळ्यात गोठ, पुतळ्याची माळ, कंठा, सारी, लफ्फा, ठुशी, साखळ्या, चंद्रहार तर मनगटात बांगड्या, पाटल्या, तोडे व बोटात अंगठ्या इत्यादी सोन्याचांदीचे दागिने घालतात. सधवा स्त्रिया कपाळी कुंकू लावतात. विधवा स्त्रियांचे मुंडण करतात व त्यांना केवळ सफेद वा लाल रंगाची वस्त्रे (आलवण) नेसण्याचीच मुभा असते. त्या कोणतेही अलंकार परिधान करीत नाहीत व घराबाहेर पडण्याची त्यांना परवानगी नसते.             
 
     
  Nature and Behaviour  
  Gazeteers of Bombay Residency नुसार: चित्पावनांच्या हुशारी, कुशाग्र आणि तल्लख बुद्धी, चाणाक्ष आणि धूर्त स्वभाव या गुणांमुळे मराठा राज्यकर्त्यांनी चित्पावनांचा उपयोग हेरगिरी आणि हुन्नरी कामांसाठी करून घेतला. चातुर्य, व्यवस्थापन कौशल्य, राज्यकारभारातील नैपुण्य या आपल्या अंगभूत गुणांमुळे त्यांनी ढासळते मराठा साम्राज्य नुसते सावरलेच नाही तर वाढवले देखील. चित्पावन समाज हा अभ्यासू, बुद्धिवान, व्यवहारी पण थोडा कंजुषपणाकडे झुकणारा, धडाडीने वागणारा, चाणाक्ष, स्वाभिमानी, तत्पर, आत्मविश्वासपूर्ण, दिलेल्या कामात स्वतःला पूर्ण झोकून देणारा असा आहे. त्यामुळे हाती घेतलेल्या कामात यशस्वी होणारा आहे. धर्मशास्त्रात पारंगत असल्याने कऱ्हाडे व देशस्थांच्या तुलनेत धर्म कार्यात चित्पावनांचे वर्चस्व आहे. त्यामुळे भिक्षुकीचा व्यवसाय मुख्य आहे.
 
कुशाग्र बुद्धिमत्ता, विचार-उच्चार-आचार स्वातंत्र्य, स्वाभिमानी व स्वावलंबी वृत्ती, अर्थार्जनासाठी देशाटनाची तयारी, धोरणी (क्वचित धूर्त) स्वभाव, पराकोटीची देशभक्ती इत्यादी गुणविशेष चित्पावनांचे वैशिष्ठ्य आहे. अर्थात क्वचित या गुणांच्या अतिरेकामुळे कंजूष, गर्विष्ठ, स्वार्थी, दुराग्रही, उन्मत्त इत्यादी दुषणे चित्पावनांना बहाल केली गेली.
 
     
  Food Habitat  
  चित्पावन मुळचे शाकाहारी. रोजच्या जेवणात भाजांमध्ये गुळाचा मुबलक वापर फक्त चित्पावनांत   करतात. आहारात दही, ताक इत्यादी दुग्धजन्य पदारथांचा सढळ वापर असतो. तांदूळ हेच कोकणातील महत्वाचे पीक असल्याने जेवणाची सुरवात वरण-भातानेच होते व तोंडी लावण्यास अम्बोशीचे लोणचे. दुभती जनावरे पाळल्याने दुध, तूप आणि दुग्धजन्य गोड पदार्थांचा समावेश जेवणात असे. मुख्यत्वे गोडाचाच समावेश आहारात असतो. तिखट व पित्तकारक आहार, मांसाहार तसेच अपेयपान चित्पावनांस वर्ज्य असे. या आहारसवयी गुजरात व कच्छ प्रांतातील आहारसवयींशी बऱ्याच प्रमाणात जुळतात. (संदर्भ: श्री. प्रकाश गोडसे: गोडसे कुलवृत्तांत)
 
     
  Development  
  कोकणात येऊन स्थायिक झालेले हे चित्पावन ब्राह्मण वेदविद्या, गणित, ज्योतिष, स्थापत्य आदि शास्त्रातही पारंगत होते. त्यामुळे यथावकाश, कर्तव्य म्हणून शिकलेल्या वेदविद्येचा उपयोग दुसऱ्यांचे पौरोहित्य करण्याच्या कामी इतर ब्राह्मणांसारखा चित्पावनांनी फारसा केला नसावा. कारण चित्पावन ब्राह्मणांत भिक्षुक वर्ग फारसा उरला नाही. युक्तीने आणि परिश्रमाने उपजीविका करण्याकडे त्यांचा कल असे. स्थलांतरित झाल्यानंतर खाडीकाठच्या जमिनींचे मळे करून व डोंगरउताराची ओसाड जमीन विकसित करून शेती करणे हा व्यवसाय करणाऱ्या चित्पावनांना ‘खोत’ म्हणत. असेही म्हणत कि ‘ओसाड जमीनीतूनही चित्पावन सोने पिकवेल’. प्राप्त परिस्थितीमुळे अस्तित्व टिकवणे या एकमेव हेतूमुळे, आपत्काळासाठी धनसंचय करणे, त्यासाठी केवळ अनावश्यकच नव्हे तर सर्वसाधारण खर्चालाही कात्री लावणे, मिंध्यत्व न स्वीकारता उपजीविकेचे विविध पर्याय शोधणे, अन्नाचा अपव्यय न होऊ देणे, वंशवृद्धीमुळे निर्वाहात कमतरता आल्यास स्थलांतर करणे इत्यादी मनोवृत्ती, अंगीकारल्या गेल्या. बरेच यशस्वी चित्पावन मिळालेल्या संपत्तीतून सावकारी ही करीत. मारवाडी समाजाशी या सर्वच बाबतीत असलेले साधर्म्य हे चित्पावनांच्या राजस्थान व कच्छ प्रांतातून झालेल्या स्थलांतराच्या सिद्धाताची पुष्टी करते. परंतु मारवाड्यांनी वैश्यवृत्ती वापरून व्यापार-उदीम करून साधलेली आर्थिक प्रगती साधणे मात्र ब्राह्मण असल्याने चित्पावनांना शक्य झाले नाही.
 
अर्थात अंगी असलेल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर, पेशवे काळात चित्पावन ब्राह्मणांनी महाराष्ट्रात राज्यही केले. त्याकाळात व त्यानंतरही मुत्सद्दी, परदरबारचे वकील, सेनापती, सावकार, राजकारणी आदि उच्चपदे चित्पावनांनी भूषवली. स्वातंत्र्यलढ्यात तर चित्पावनांचेच वर्चस्व होते. आगरकर, टिळक, रानडे, केळकर, फडके, चाफेकर, सावरकर हे तर स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी. परंतु राजकारणासारख्या जटील व संधिसाधू क्षेत्रात अत्यंत आवश्यक असलेला लवचिकपणा, तडजोडीची वृत्ती यांच्या कमतरतेमुळे हे वर्चस्व चित्पावनांना टिकवता आले नाही. भिक्षुकी व विद्यादानाच्या क्षेत्रातील अपुऱ्या अर्थार्जनामुळे साहजिकच चित्पावन समाज नोकरीपेशाकडे आकर्षित झाला. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात मात्र तत्कालीन सरकारच्या आरक्षण व अनुनयाच्या धोरणांमुळे नोकरीपेशातही चित्पावनाची कोंडी होऊ लागली. बदलत्या काळाचे भान आल्यावर चित्पावनांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सरकारी अधिकाराची पदे, शिक्षण, न्यायदान, वैद्यकीय, अभियांत्रिकी आदि क्षेत्रे काबीज केली. तसेच उच्चविद्याविभूषित होऊन व्यापारउदीम, कारखानदारी आदि स्वतंत्र व्यवसायाकडे चित्पावनांचा कल वाढू लागला. आज शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, कंत्राटदार, व्यापारी, स्वतंत्र व्यवसाय आदि क्षेत्रात चित्पावन ब्राह्मण मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत.
भाषा व वाणीवरील प्रभुत्व हे तर चित्पावनांचे खास वैशिष्ठ्य. त्यामुळेच साहित्य, कला, नाट्य चित्रपट आदि क्षेत्रातही चित्पावन आघाडीवरच राहिले. दामले, फाळके, आपटे, अत्रे, भावे, खाडिलकर, देवल, मराठे अशी नावे मराठी नाट्य व सिनेसृष्टीत गाजू लागली. अगदी हल्ली हल्ली पर्यंत या क्षेत्रात चित्पावनांची मक्तेदारी होती. पण गेल्या २/३ दशकात, शिक्षण व रोजगार क्षेत्रात गुणवत्तेव्यतिरिक्त इतर निकष लावले गेल्याने रोजगाराच्या संधी चित्पावानांसाठी जसजशा लोप पावत गेल्या, तसतसा त्यांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत गेला. मायमराठी त्यांना परकी होत गेली. उच्चशिक्षित चित्पावनांनी परदेशाची कास धरली. या क्षेत्रातील अनिश्चितता, आणि दीर्घकाळ या क्षेत्रातील त्यांच्या प्राबल्यामुळे आता त्यांना मिळणारी सापत्न वागणूक हेही कारण पुरेसे होते त्यांच्या या क्षेत्रातील पीछेहाटीला.  
 
     
  Religious  
  भगवान परशुरामांना मानणारे व स्वतःला १४ ऋषींचे वंशज म्हणवणारे चित्पावन ब्राह्मण सदाचरणी आणि धर्माचरण करणारे असत. स्वातंत्र्यपूर्व कालखंडापर्यंत अत्यंत ज्ञानोपासक, विद्यादानी, समाजाचे मार्गदर्शक,  धार्मिक व प्रसंगी पराकोटीच्या सनातनी  वृत्तीचे दर्शन घडवणारे अशी चित्पावनांची ओळख होती. प्रत्येक गोत्राचा एक देव (कुलस्वामी) व एक देवी (कुलस्वामिनी) अशी कुलदैवते असत. त्यांचे मनोभावे पूजन हा चित्पावनांच्या दिनचर्येचा एक भाग होता. हिंदू धर्मातील रूढी, व्रतवैकल्ये यांचे पालन करणे, सर्व सणवार उत्साहाने साजरे करणे आणि आयष्यात एकदा तरी काशी यात्रा करणे हे चित्पावनांचे वैशिष्ठ्य. मनुस्मृतीतील चातुर्वर्ण्य ही संकल्पना, समाज एकत्रित, संस्कारित, सधन, सबळ आणि सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानविज्ञान, व्यापारउदीम, संरक्षण व आरोग्य ह्या मुलभूत संकल्पनांवर आधारित असल्याने तत्कालीन समाजाच्या हितासाठीच होते. विद्यादान आणि भिक्षुकी याद्वारे समाजाच्या वैचारिक आणि धार्मिक प्रगतीत चित्पावनांचे मोलाचे योगदान होते. चित्पावनाच्या हातून घडलेले धार्मिक कार्य हे सर्वश्रेष्ठ मानले जाई. त्यामुळे या चातुवर्ण्य पद्धतीत चित्पावन केंद्रस्थानी होते.
 
परंतु बदलत्या कालानुरूप त्यात बदल होणे आवश्यक असल्याची व जातिभेदाचा अतिरेक झाल्याची जाणीव सावरकर, आगरकर, गोखले आदि तत्कालीन चित्पावन कुलोत्पन्न समाजसुधारकांनीच करून दिल्याने, अंतर्मुख झालेल्या चित्पावन समाजाने स्पृश्यास्पृश्यता झुगारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यातच स्वातंत्रोत्तर काळात, गांधीवधामुळे, चित्पावनांच्या कर्मठ वृत्तीमुळे आणि  मनुस्मृती व हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीतींविरुद्ध उच्चवर्णीयांच्या विरोधात उसळलेल्या जनक्षोभामुळे चित्पावन समाज भरडला गेला. चित्पावनांनी शहरे व महानगरांतून बऱ्याच  प्रमाणात अस्पृश्यतेचा त्याग केला असला तरी ग्रामीण भागात मात्र अस्पृश्यता निवारणाला इतर सवर्णांच्या असलेल्या विरोधामुळे याबाबतीत चित्पावन समाज म्हणावी तशी प्रगती करू शकला नाही. समाज जसजसा प्रगतीशील होत गेला तसतसे धर्माचरणाचे गांभीर्य कामी होऊन समाजकारणाचे प्राबल्य झाले. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून कालानुरूप चित्पावनांच्या धार्मिक वृत्तीतील कर्मठता नष्ट झाली. 
 
     
 
     
     
  Copyright © Marathe Pratishthan 2026 Visitor Counter Designed and developed by Prajakta Software