Annual General Meeting-2015  
 

 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत 

 
मराठे प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा यंदा प्रथमच मुंबई बाहेर पुण्यात रविवार दि. 23 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 2:30 या वेळेत संपन्न झाली. प्रतिष्ठानचे सभासद आणि ज्येष्ठ साहित्यिक श्री. ह. मो. मराठे हे या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समाधानकारक उपस्थितीत सुमारे 11:15 ला सभेला सुरुवात झाली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रमाकांत विद्वांस प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकल्याने प्रतिष्ठानच्या ‘घटने’नुसार सभेचे अध्यक्षस्थान, उपाध्यक्ष श्री. सी. गो. खांबेटे यांनी भूषवले. श्री. खांबेटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेला रीतसर सुरुवात करण्याची सूचना कार्यवाह श्री., हेमंत मराठे यांना केली. 

कार्यवाह श्री. हेमंत अरुण मराठे यांनीही उपस्थितांचे स्वागत करून सभेचे कामकाज सुरु केले. गतवर्षीच्या सभेचे इतिवृत्त श्री. हेमंत यांनी वाचून दाखवल्यानंतर सभेने ते सर्वानुमते मंजूर केले. त्यानंतर कोषाध्यक्ष श्रीनिवास मराठे यांनी स्वतःचा अल्प परिचय करून देऊन प्रतिष्ठानच्या आर्थिक ध्येय धोरणांविषयी कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयांची माहिती सभेस दिली. आर्थिक वर्ष 2014-15 चा ताळेबंद व आय-व्यय पत्रकासंबंधी काही सभासदांना असलेल्या शंकांचे समाधानकारक निरसन श्रीनिवास यांनी केल्यानंतर प्रतिष्ठानचे ‘Accounts’ सभेने मंजूर केले. 

उपस्थितांपैकी, डॉ. रवींद्र दिनकर मराठे, विरार यांनी स्वतःचा परिचय करून देऊन ज्ञातीबंधावांना मदत करण्याच्या दृष्टीने जैन समाजाचा आदर्श ठेवण्याचे आवाहन केले. वाढत्या वैद्यकीय खर्चाचा बोजा हलका करण्याच्या दृष्टीने प्रतिष्ठान करू शकत असलेल्या काही बाबींचा उहापोह केला. त्यासाठी प्रतिष्ठानचा वैद्यकीय निधी अपुरा असल्याचे खंत व्यक्त करून तो समाधानकारक पातळीपर्यंत नेण्याची तातडीची गरज असल्याचे प्रतिपादन केले. वैद्यकीय निधीसाठी स्वतः रु. 500/- ची देणगी देऊन उपस्थितांना देणग्या देण्यास उद्युक्त केले. पुण्यातील ख्यातनाम मराठे ज्वेलर्स चे श्री. बळवंत (मिलिंद) मराठे यांनी याचा शुभारंभ करून, रु.1लाखाची भरघोस देणगी प्रतिष्ठानच्या ‘वैद्यकीय निधी’ला देऊन, कोषाध्यक्ष श्रीनिवास मराठे यांच्या, आगामी वर्षात वैद्यकीय निधीत 10 लाख वरून 20 लाख पर्यंत वृद्धी करण्याच्या संकल्पाच्या पुर्ततेची जणू ग्वाहीच दिली. सर्वांनी टाळयांच्या गजरात या अलौकिक दातृत्वाचे कौतुक केले. 

डॉ. रवींद्र मराठे यांनी ते संलग्न असलेल्या रुग्णालयांतून प्रतिष्ठानच्या सभासदांसाठी Medical checkup, Consultation आदि सुविधा मोफत अथवा अत्यल्प खर्चात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. उच्चपदस्थ किंवा व्यावसायिक असलेल्या व्यक्तींनी, कुलबांधवांना नोकरी व्यवसायातही प्राधान्य तसेच जरूर ते सर्वतोपरी साह्य देण्याची गरज प्रतिपादन केली. संतोष मराठे यांनीही 2015-16 हे वर्ष ‘वैद्यकीय निधी संकलन वर्ष’ मानून सर्वानीच निधी 20 लाख करण्याच्या संकल्पाच्या पूर्ततेच्या कार्याला वाहून घेण्याचे आवाहन केले. कस्तुरी मराठे यांनी प्रतीष्ठानासाठी कार्य करण्याची इच्छा असली तरी ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन होत नसल्याची खंत व्यक्त केली असता, कार्यवाह हेमंत यांनी अशा युवकांसाठी विशेष सभा घेऊन त्यांच्या उत्साहाला साजेसे कार्य त्यांना देण्याची योजना तयार करण्याचे आश्वासन दिले. यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज संपल्याचे कार्यवाह श्री. हेमंत यांनी जाहीर केले. 

यापुढील कार्यक्रम होता गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्याचा. खंत अशी वाटते की केवळ एक विद्यार्थीनी यासाठी प्रत्यक्ष उपस्थित होती व तिचा सत्कार मुख्य पाहुणे ह.मो. मराठे यांच्या हस्ते केला गेला. अशा पारितोषिक विजेत्यांची नावे पुढे दिली आहेत. प्रतिष्ठानसाठी विशेष गौरवास्पद बाब म्हणजे निवृत्त कर्नल. प्रमोदन मराठे यांना संरक्षण क्षेत्राशी संबंधित विषयातील संशोधनाबद्दल Doctorate मिळाली व पुण्यातील गौरी चंद्रशेखर मराठे-पंडित हिने केंदीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या भारतीय नागरी सेवा परीक्षेत 598 वा क्रमांक मिळवला. असा सन्मान मिळवणारी ती पहिलीच मराठे महिला ठरली. काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे श्री. प्रमोदन यांना लवकर जावे लागले व गौरीला Training मुळे हैद्राबादला जावे लागल्याने या दोघांचा गौरव त्यांच्या अनुपस्थितीत श्री. ह. मो मराठे यांच्या हस्ते संपन्न झाला. 

प्रमुख पाहुणे श्री. ह. मो मराठे यांच्या वयाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून प्रतिष्ठानतर्फे त्यांचा सत्कार सभेचे अध्क्ष श्री. खांबेटे यांच्या हस्ते केला गेला. सत्काराला उत्तर देतांना ‘समाजवादी’ ते ‘ब्राह्मण्याचा खंदा पुरस्कर्ता’ हा आपला प्रवास ह.मों.नी वर्णन केला. ब्राह्मण समाजासाठी करण्यासारखे अजून बरेच काही बाकी असल्याची खंत व्यक्त केली व यासाठी ब्राह्मण समाजाची एकी महत्वाची असल्याचे प्रतिपादन केले. 

केवळ या सभेसाठी आलेल्या गोवा येथील अरुण शिवराम मराठे तसेच सांगली येथील श्री. भास्कर मराठे व मोरेश्वर मराठे यांचा सत्कार श्री. खांबेटे यांनी केला. विशेष म्हणजे, वैद्यकीय निधीसाठी वैयक्तिक रु.11,000/- ची देणगी श्री. भास्कर मराठे यांनी जाहीर केली. उपस्थितांनी टाळ्या वाजवून भास्कर मराठे यांचे अभिनंदन केले. मराठे कुळाचे नियोजित अखिल भारतीय कुलसंमेलन दि. 23 व 24 जानेवारी 2016 ला सांगली येथील सुप्रसिद्ध ‘खरे मंगल कार्यालयात’ घेण्याचे श्री. भास्कर मराठे यांनी एक संयोजक या नात्याने जाहीर केले. सर्व कुलबांधवांना या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून ते यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

अध्यक्ष श्री. रमाकांत विद्वांस यांनी आपल्या संदेशात उपस्थित राहू शकत नसल्याची खंत व्यक्त केली. सभेसाठी सुयश चिंतणारा त्यांचा संदेश कार्यवाह हेमंत यांनी वाचून दाखवला. पुणे शाखेचा वार्षिक वर्षापन दिन 26 जानेवारीला असतो. यावर्षी तो सांगली येथील कुलसंमेलनातच साजरा होईल असे पुणे शाखेच्या वतीने सौ. निलांबरी मराठे यांनी जाहीर केले. त्यानंतर जराशा उशिराने का होईना, उपस्थितांनी रुचकर आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. सांगलीला कुलसंमेलनात भेटण्याचे आश्वासन एकमेकांना देत उपस्थित घरोघर रवाना झाले. 

विशेष प्राविण्य दाखवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांची यादी. 
अनु.     नाव                                                         परीक्षा                          गुण                 पैकी                    टक्के 
1.      अनिरुद्ध चंद्रशेखर मराठे, ठाणे                           ISCE 10वी                    560               600                   93.33%
2.      स्वानंद उदय मराठे, मालवण                             SSC 10वी                    452                500                  90.14%
3.      हेरंब अनंत मराठे, डोंबिवली                               SSC 10वी                    439                500                  87.80%
4.     प्रियांका मिलिंद मराठे                                      HSC12वी(सायन्स)          558                650                  85.85%
5.     श्रद्धागौरी श्रीपाद मराठे, पडेल                              HSC12वी(कॉमर्स)            560                650                 86.15%
6.      गिरिजा संजय मराठे,                                     M.A.(योगशास्त्र)              976              1240                 78.71%
7.     अक्षय हेमंत परांजपे, मुंबई                                CS Executive                        संपूर्ण भारतात 2रा क्रमांक         
8.     सौ. गौरी चंद्रशेखर मराठे-पंडित, पुणे                   UPSC, नागरी सेवा परीक्षा             संपूर्ण भारतात 598 वा क्रमांक     

याव्यतिरिक्त 8/9 विद्यार्थ्यांची गुणपत्रके येणे बाकी आहेत. त्यांच्या गुणपत्रकांची छाननी झाल्यावर त्यांना, तसेच पुण्यातील सभेत पारितोषिके स्वीकारू न शकलेल्या विद्यार्थ्यांना, त्यांची पारितोषिके पोस्टाने पाठविण्यात येतील.