उद्योजकता पुरस्कार सोहळ्याची यशस्वी सांगता .....  
 

                आपले सभासद आणि बोरीवली येथील निवृत्त न्यायाधीश श्री. दिलीप मराठे आणि त्यांचे बंधू सर्वश्री. प्रमोद, गुरुनाथ व अरुण यांनी प्रायोजित केलेला ‘विभागीय मेळावा’ तसेच ‘निर्माण ग्रुप’ पुरस्कृत ‘उद्योजकता पुरस्कार’ प्रदान सोहळा असे जुळे कार्यक्रम सभासदांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाले. सभासदांसह वरुणराजाचेही स्वागत करतांना उपस्थितीबद्दल साशंक असलेल्या आयोजक आणि कार्यकारिणी सभासदांना सुमारे 10:30 वाजता भरलेले सभागृह पाहून हायसे वाटले. या वरुणराजाच्या कृपेने 10:00 चा कार्यक्रम 10:35 सुरु झाला. उपस्थितांचे स्वागत करून सूत्रसंचालक कार्यवाह श्री. हेमंत यांनी विश्वस्त श्री. आनंदराव आणि सुलभाताई, उपाध्यक्ष सी.गो. खांबेटे, हितगुज संपादिका डॉ.सौ.सुमेधाताई, कोषाध्यक्ष श्रीनिवास, आणि आयोजक बंधुद्वय श्री. दिलीप व प्रमोद यांना व्यासपीठावर आसनस्थ होण्याची विनंती केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रमाकांत विद्वांस प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे समारंभाचे अध्यक्षपद सी.गो. खांबेटे यांनी भूषवले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गजाननाचे पूजन व दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.


                  सर्वप्रथम ‘हितगुज’चे पूर्वसंपादक स्व. ल.शं, अध्यक्षांच्या पत्नी स्व. शुभा विद्वांस, व इतर ज्ञात/अज्ञात दिवंगताना 1 मिनिट स्तब्धता पळून श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षांनी दिलेल्या शुभेच्छा व त्यांच्या निवेदनाचे वाचन हेमंत यांनी केले. तसेच त्यांनी विभागीय मेळाव्याचे महत्व विषद करून कुलबांधवांच्या एकजुटीसाठी असे विभागीय मेळावे विविध ठिकाणी व जास्त प्रमाणात घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. ‘हितगुज’ च्या संपादिका सुमेधाताई यांनी हितगुजच्या वाटचालीचा आढावा घेतला, तर श्रीनिवास यांनी संकेतस्थळाचे नूतन स्वरूप व परस्पर संबंध दृढ करण्याच्या बाबतीत संकेतस्थळाचे योगदान याचे विवेचन केले. मेळाव्याचा गाभा असलेल्या ‘परस्पर परिचय’ या कार्यक्रमामुळे कुलबांधवांचे विविध क्षेत्रातील योगदान उपस्थितांना ज्ञात झाले. उदंड उपस्थितीमुळे हा कार्यक्रम बराच वेळ रंगला.


                    यानंतरच्या ‘उद्योजकता पुरस्कार’ वितरण समारंभाचे उत्सवमूर्ती सौ. सुप्रिया आणि श्री. शरद, प्रायोजक-‘निर्माण ग्रुप’ चे श्री. अजित, उपाध्यक्ष सी.गो. खांबेटे, आयोजक श्री. दिलीप स्थानापन्न होऊन पुरस्कार प्रदान सोहळा सुरु झाला. श्री शरद व सौ सुप्रिया यांचे काही नातेवाईकही त्यांचा हा कौतुक सोहळा अनुभवण्यासाठी उपस्थित होते. मानपत्र व धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आणि पुरस्कार देण्यामागची भूमिका सूत्र संचालक श्री. हेमंत यांनी मांडली. प्रायोजक श्री. अजित यांनी चित्पावनांत उद्योजकता वाढीची नितांत आवश्यकता व उद्योजकतेचे राष्ट्रउभारणीत असलेले महत्व विषद केले. वडिलांच्या अकाली मृत्युनंतर खचून न जाता मित्रासमवेत बांधकाम उद्योगाची मुहूर्तमेढ रोवताना आलेल्या अडचणींवर कशी मात केली व त्यासाठी कोणत्या दिव्यांतून जावे लागले त्या अनुभवांचा थरार उपस्थितांनी त्यांच्या निवेदनातून अनुभवला. आपले हे विधान त्यांनी बटाटेवड्याचा मार्मिक दृष्टांत देऊन स्पष्ट केले.


                   ‘नवचैतन्य प्रकाशन’ ही संस्था कशी नावारूपास आली यामागचा इतिहास, त्यांची प्रकाशने, त्यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांच्या यशाचा चढता आलेख याचा लेखाजोखा हेमंत यांनी सादर केला. या उत्सवमूर्ती दाम्पत्याला देण्यात येणारे मानपत्र हितगुज संपादिका सुमेधाताई यांनी शब्दांकित केले, माजी अध्यक्ष व विश्वस्त श्री. आनंदराव यांच्या स्नुषा सौ. सुप्रिया मंदार यांनी सुवाच्य हस्ताक्षरात ते लिहिले व दूरदर्शनच्या वृत्त निवेदिका सौ. मंजिरी मराठे यांनी त्याचे वाचन केले. नंतर श्री अजित व सी.गो.खांबेटे यांच्या हस्ते हा पुरस्कार सौ. सुप्रिया आणि शरद मराठे दाम्पत्यास देण्यात आला. श्री. खांबेटे यांनी श्री. शरद यांना शाल व  सौ. सुमेधाताई यांनी सौ. सुप्रिया यांना हळदीकुंकू व गजरा देऊन सन्मानित केले. मान्यवरांना पुष्पगुच्छ न देता वाचनीय पुस्तके देण्याची हेमंत यांची अभिनव कल्पना कार्यकारिणीने अमलात आणली व त्याचे उपस्थितांनी स्वागतच केले.


                   सत्काराला उत्तर देताना भारावलेल्या श्री. शरद यांनी या पुरस्काराबद्दल प्रायोजक श्री अजित व प्रतिष्ठान याचेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. हा घरचाच पुरस्कार असल्याने त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. हा व असे पुरस्कार आपल्या प्रकाशनाच्या कार्यासाठी उत्साह व प्रोत्साहन देतात असे प्रतिपादन त्यांनी केले. सौ. सुप्रिया या मुळच्या जोशी. वडिलांच्या मुद्रण व्यवसायामुळे हा व्यवसाय सुरु करण्यास प्रेरणा मिळाली. उत्तम सहकारी व वितरण व्यवस्था उत्तम सांभाळणारे पती श्री शरद यांच्या अथक प्रयत्नांनी व्यवसाय नावारूपास आला व मिळालेल्या विविध पुरस्कारांमुळे अधिकाधिक यशाची द्वारे उघडली असे सांगून या कौटुंबिक पुरस्काराचे महत्व आगळेच असल्याचे त्या म्हणाल्या. निमंत्रक मराठे बंधुंच्यावतीने श्री. दिलीप मराठे यांनी या समारंभाचे आयोजन हे एका कौटुंबिक सोहळ्यासारखे असल्याचे सांगितले आणि सर्व सभासदांना उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद दिले. संगीताशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला परिपूर्णता येत नसते. त्यामुळे कुलभगिनी संध्या खांबेटे, सौ. अश्विनी, सौ. श्रुती व कुमारी आश्लेषा मराठे यांच्या सुमधुर व  सुश्राव्य गायनाने समारंभाची सांगता झाली.


                   अर्थातच नंतर असलेल्या नितांत स्वादिष्ट प्रीतीभोजनाचा आस्वाद घेऊन मंडळी घरोघर परतली ती बहुधा या हृद्य समारंभाच्या सुमधुर स्मृती मनात घेऊनच. या समारंभाचे आयोजक श्री. दिलीप व सर्वश्री. प्रमोद, गुरुनाथ, अरुण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कल्पकतेला व आयोजन कौशल्याला दाद द्यावी तितकी कमीच आहे. प्रतिष्ठान त्याबद्दल त्यांचे सदैव ऋणी राहील. असे मेळावे विविध ठिकाणी व ठराविक कालावधीनंतर स्थानिक कुलबांधवांच्या पुढाकाराने करण्यात यावेत असा संकल्प कार्यकारिणीने केला आहे व त्याच्या पूर्तीसाठी आपल्या सर्व कुलबांधवांचे सहकार्य राहील असा विश्वास आहे.